भारताच्या वाघिणींनी जिंकला आशिया कप! अंतिम फेरीत बांगलादेशला चारली पराभवाची धूळ

Women’s Emerging Asia Cup 2023: महिला इमर्जिंग आशिया चषक 2023 च्या अंतिम फेरीत भारत अ ने बांगलादेश अ संघाचा पराभव केला. टीम इंडियाने हा सामना 31 धावांनी जिंकून विजेतेपदाचा सामना जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 गडी गमावून 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 96 धावांत ऑलआऊट झाला.

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघ फलंदाजीसाठी उतरला. डावाची सुरुवात करणाऱ्या कर्णधार श्वेता सेहरावत आणि उमा छेत्री या जोडीने केवळ 28 धावांची भर घातली. मात्र यानंतर कनिका आहुजाच्या 30 धावा आणि वृंदा दिनेशच्या 36 धावांच्या जोरावर संघाला 20 षटकात 127 धावा करता आल्या. बांगलादेशकडून सुलताना खातून आणि नाहिदा अख्तरने 2-2 विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 19.2 षटकांत 96 धावा करत सर्वबाद झाला. बांगलादेशच्या डावात फक्त 3 फलंदाज होते जे दुहेरी आकडा पार करू शकले. टीम इंडियाच्या विजयाची हिरो ठरली श्रेयंका पाटील. श्रेयंकाने 4 षटकात केवळ 13 धावा देत 4 बळी घेतले. त्याचवेळी मन्नत कश्यपने 3 आणि कनिका आहुजाने 2 विकेट्स घेतल्या.