आफ्रिकन स्वाइन तापामुळे ‘या’ ठिकाणी 2000 डुकरांचा मृत्यू, व्हायरस रोखण्यासाठी सरकारने बनवला ‘किलिंग प्लान’

मध्य प्रदेश – मध्य प्रदेशातील शिवपुरी (Shivpuri, Madhya Pradesh) येथे आफ्रिकन स्वाइन फिव्हरमुळे (African Swine Fever) आतापर्यंत सुमारे 2,000 डुकरांचा मृत्यू (Death of Pigs) झाला आहे. त्यावर कारवाई करत आता बाधित भागात डुकरांना मारले जाणार आहे. अशी माहिती पालिकेने दिली आहे. वास्तविक, शिवपुरी शहरात गेल्या काही दिवसांपासून डुकरांच्या मृत्यूच्या घटनेनंतर पशुसंवर्धन विभागाने मृत डुकरांचे नमुने भोपाळ (Bhopal) येथील राज्य पशु रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठवले होते. मृत डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फिव्हर एएसएफ विषाणूची पुष्टी झाली आहे.

पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ तामोरी म्हणाले की, मानवाने या आजाराबाबत घाबरण्याची गरज नाही, कारण आफ्रिकन स्वाइन फिव्हर हा आजार (Disease) फक्त डुकरांमध्ये आढळतो. सर्वसामान्य नागरिकांनी आजूबाजूला डुकरांचा अनैसर्गिक मृत्यू होत असल्यास तातडीने जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आफ्रिकन स्वाइन फीवर (ASF) हा डुकरांचा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे, जो गंभीर आर्थिक आणि उत्पादन नुकसानीसाठी जबाबदार आहे. आफ्रिकन स्वाइन फिव्हर (ASF) साठी सध्या कोणतेही उपचार किंवा लस उपलब्ध नाही.

या रोगाच्या प्रतिबंधासाठी, भारत सरकारच्या (Government of India) राष्ट्रीय कृती आराखड्यानुसार, बाधित क्षेत्राचा एक किलोमीटर त्रिज्या संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि त्याच्या सभोवतालचा नऊ किलोमीटर त्रिज्या सर्व्हिलन्स झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. संक्रमित झोनमधील डुकरांना मानवतेने मारले जाईल आणि नुकसान भरपाईचे वाटप केले जाईल. यासोबतच रोग नियंत्रणासाठी पुढील आदेश येईपर्यंत डुकराचे मांस विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.