उद्धव ठाकरे वाघाचा मुलगा, आम्हाला त्यांच्यासोबत काम करायचंय- अरविंद केजरीवाल

मुंबई- काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी वंचित बहुजन आघाडीने युती केली होती. यानंतर आता राज्यात आणखी एका युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्त्वाखालील आम आदमी पार्टी (AAP) उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) हात मिळवू शकते. काल (२४ फेब्रुवारी) स्वत: अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यामुळे या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील निवासस्थानी, ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलतांना केजरीवाल यांनी आम्हांला एकमेकांच्या विरोधात लढायचं नाही तर सोबत मिळून काम करायचंय असं म्हटलं.

शिंदे गटाविरुद्ध सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या लढाईबद्दल बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, उद्धव ठाकरे हे वाघाचा मुलगा आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये नक्कीच न्याय मिळेल. आम्हाला एकमेकांच्या विरोधात लढायचं नाही तर सोबत मिळून काम करायचं आहे. या नात्याला आम्ही पुढे घेऊन जाऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलं.