हिंदु धर्म अन् देवतांचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’मागे शिंदे-फडणवीस? कोणी केला हा गंभीर आरोप

आदिपुरुष (Adipurush) हा बहुप्रतिक्षित चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आदिपुरुष रिलीज झाल्यानंतर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील डायलॉग्सवरुन दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अगदी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही काहींनी केली आहे. अशातच आता या वादात आपचे नेते खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी उडी घेतली असून यांनी या चित्रपटात वापरण्यात आलेल्या डायलॉगवरून अनेक भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या चित्रपटावरून सुरू झालेल्या वादाला आता राजकीय वळण लागताना दिसत आहे.

संजय सिंह यांनी या चित्रपटामध्ये भाजपच्या अनेक मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. भाजप जनता पक्षाच्या नेत्यांनी हा चित्रपट तयार करायला लावला. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शिवराजसिंग, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मनोहरलाल खट्टर हे भाजपचे मुख्यमंत्री आणि बडे नेत सहभागी आहेत, असा आरोप संजय सिंह यांनी यावेळी केला आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदु धर्म, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, माता सीता भगवान बजरंग बली यांचा अपमान केला जात आहे. या चित्रपटात घाणेरड्या भाषेचा वापर करण्यात आला आहे, ज्याचा रामायणाशी काही संबंध नाहीये, असे संजय सिंह म्हणाले.