मुख्यमंत्री दिल्लीच्या पातशाहच्या आदेशावरून निर्णय घेतात, दानवेंची शिंदेंवर टीका

संभाजीनगर – हैदराबाद मुक्ती संग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिनी सकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. मात्र 9 वाजता होणारं हे ध्वजारोहण 7 वाजताच उरकण्यात आले आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलेल्या ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

दरम्यान, यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही, एकनाथ शिंदे दिल्लीच्या पातशाहच्या आदेशावरून निर्णय घेतात. ते दिल्लीच्या पातशाह यांच्या आदेशावरून हैदराबादला जात आहेत, असं त्यांनी म्हटलं.

शिवाय दरवर्षी सकाळी 9 वाजता मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम होतो. पण यंदा मुख्यमंत्री सकाळी सात वाजता आले आणि कार्यक्रम झाला. पण दरवर्षीप्रमाणे आम्ही सकाळी 9 वाजता शासकीय ध्वजारोहण करणार आहोत. हा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.