शिंदेंचा उबाठा गटाला आणखी एक धक्का, संजय राऊतांचे निकटवर्तीय उपेंद्र सावंत यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुंबई :- उबाठा गटाचे विक्रोळी कन्नमवार नगरचे माजी नगरसेवक आणि संजय (Sanjay Raut) आणि सुनील राऊत (Sunil Raut) यांचे निकटवर्तीय उपेंद्र सावंत (Upendra Sawant) यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. सकाळचा भोंगा ज्या विक्रोळीतून वाजतो त्याच विक्रोळीच्या माजी नगरसेवकाला पक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊत बंधूंना ‘जोर का झटका’ दिला असल्याची चर्चा आहे.

उपेंद्र सावंत यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेमध्ये स्वागत केले. यावेळी बोलताना सावंत यांनी गेले दीड वर्षे आपल्या प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नाही. ज्यांनी आपल्याला निवडून दिले त्या भागाचा विकास करता येणे शक्य होत नसेल तर कसे चालणार असे म्हणत आपल्या प्रभागातील विकासकामाना गती मिळावी यासाठी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना उपेंद्र सावंत यांनी शिवसेनेमध्ये आल्यामुळे शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या नगरसेवकांची संख्या 33 झाली असून त्यातील 25 हे उबाठा गटाचे असल्याचे सांगितले. ज्या लोकांनी त्याना निवडून दिले त्याच लोकांची कामे करणे शक्य होत नसेल, विकासकामे होत नसतील तर नगरसेवक काय करणार..? त्यामुळेच अनेक नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

कधीही निवडणूक घ्या सामोरे जाण्याची आमची पूर्ण तयारी

निवडणूक घेण्याची हिम्मत नसल्याचा आरोप आमच्यावर केला जातो, मात्र उबाठा गटाने वॉर्ड रचनेबाबत केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेच निवडणूक घ्यायला विलंब लागत आहे असे सांगितले. उलट शिवसेनेची निवडणूक घेण्याची पूर्ण तयारी असून कधीही निवडणुका लागल्या तरीही त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

काम सुरू झाल्याचे कळल्यावर केईएम रुग्णालयावर मोर्चा

उबाठा गटाने आज केईएम रुग्णालयावर मोर्चा काढला होता, मात्र काही दिवसांपूर्वी मी स्वतः केईएम रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. जिथे कमतरता जाणवल्या त्या त्वरित दूर करण्याचे निर्देश दिले. एवढच नव्हे तर बंद असलेल्या 6 वॉर्डचे काम तातडीने सुरू देखील करण्यात आले, काम सुरू झाल्यामुळे अस्वस्थ झाल्यामुळेच रुग्णालयावर मोर्चा काढला असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

एनडीएला हरवणं अशक्य, 2024 नंतर देखील मोदीच पंतप्रधान

सध्या देशातील वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन मध्ये टिम्ब असलेली इंडिया आघाडी तयार केली आहे. काहीही करून नरेंद्र मोदी यांना हरवणे एवढाच या आघाडीचा मुख्य अजेंडा आहे. मात्र यापूर्वी देखील विरोधकानी एकत्र येऊन 2014 आणि 2019 साली आघाडी केली होती. मात्र तरीही त्याना नरेंद्र मोदी यांना हरवणे शक्य झाले नव्हते त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देखील नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी पुन्हा एकदा बसलेले आपल्याला दिसतील असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सेना प्रवेश

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील शिरूर, आळंदी, तळवडे, राजगुरूनगर येथील विविध पक्षांचे माजी सरपंच तसेच पंचायत समिती सभापती, सदस्य यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. तर शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या पुढाकाराने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, माजी सरपंच यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे आणि असंख्य शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.