नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमा – आशिष शेलार

मुंबई – नालेसफाईची कामे दरवर्षी पेक्षा १५ दिवस उशिराने सुरु होत असून भाजपने दौरा केला त्यावेळी अत्यंत भयावह चित्र समोर आले आहे. आज पर्यंत १० % पेक्षा जास्त काम झालेले नाही. गतवर्षी १७ मे लाच वादळी वाऱ्यासह तौक्ते वादळ आले होते व मुंबई ची तुंबई झाली होती. यावर्षीही लवकर पावसाळा येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खूप कमी वेळ हाती शिल्लक आहेत. अशावेळी पारदर्शी पद्धतीने नालेसफाईची कामे पूर्ण व्हायची असतील तर कामावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची विशेष टास्क फोर्स (नालेसफाई ) नियुक्त करा, आय.ए. एस. अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून काम करायला लावा अशा मागण्या करीत भाजपाच्या शिष्ठ मंडळाने आज महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली. यातील टास्क फोर्सच्या मागणीवर आयुक्तांनी सकारात्मक असल्याने सांगितले.

भाजपा स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपने आयोजित केलेल्या सेवा सप्ताहात भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या नेतृत्वात मुंबईतील नालेसफाईची पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान जे भयावह चित्र समोर आले. त्याचा सचित्र अहवाल आज पालिका आयुक्तांना सादर करून त्यांच्याशी भाजपाने सविस्तर चर्चाही केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) वेलरासू हे देखील उपस्थित होते. आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भेटलेल्या या शिष्ठ मंडळामध्ये गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde), मनपा पक्षनेते विनोद मिश्रा (Vinod Mishra), प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, नगरसेविका राजेश्री शिरवडकर, उज्वला मोडक, नगरसेवक महादेव शिवगण आदींचा सहभाग होता. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन आमदार आशिष शेलार यांनी या संपूर्ण दौऱ्याची आणि भेटीची माहिती माध्यमांना दिली.

यावेळी आमदार आशिष शेलार म्हणाले कि, मुंबईची पाहणी केल्यानंतर मुंबई धोक्याच्या वळणावर असून सत्ताधारी फरार व प्रशासन हाताची घडी घालून बसले आहे. “पूर्व उपनगराचे” तर “पूर उपनगर” होईल कि काय अशी भीती वाटते. भांडूप येथील एपीआय नाल्यामध्ये कल्वर्टचे काम अर्धवट असून ते पूर्ण झाले नाही तर रेल्वे ट्रॅकवर  मध्ये पाणी घुसेलच शिवाय भांडूप परिसर जलमय होऊन जाईल. बॉम्बे ऑक्सिजन नाल्यामध्ये उभारलेल्या तटरक्षक भिंतीमुळे प्रवाह अडला आहे असे अजब प्रकार संपूर्ण शहरात पहायला मिळत आहेत. बहुतांश ठिकाणी कामांना सुरुवात झालेली नाही. गाळ कुठे टाकणार त्यावर लक्ष कोण ठेवणार ? त्याचे वजन कसे करणार ? असे प्रश्न प्रशासनाला विचारले असता अतिरिक्त आयुक्तांनी अकलेचे तारे तोडून गाळ घेऊन जाणाऱ्या गाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात येणार असल्याचे सांगितले हि सिस्टीम तर दरवर्षीच असते तरीही भ्रष्टाचार होतो. त्यामुळे आता आय.ए.एस. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात मैदानात उतरावे, मुंबईकरांची सेवा करावी, कामांवर लक्ष ठेवावे आणि गाळाच्या गाड्यांसोबत आय.ए.एस. अधिकाऱ्यांच्या गाड्यांना सुद्धा जी.पी.एस. बसवा अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली.

२५ ते ३० % तरी गाळ निघेल का ?

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नालेसफाईचा परिमाण ५० % ने कमी असून नालेसफाई दिड महिना उशिरा सुरु झाली आहे. पण कंत्राट रक्कमेत रु.३२ कोटींची वाढ हे गौडबंगाल काय आहे ? नालेसफाई करताना मुंबईच्या नाल्यातून २०२० साली ३ लाख ५६ हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. गतवर्षी २०२१ साली ४ लाख ३६ हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. यावर्षी मात्र केवळ २ लाख ५२ हजार क्युबिक मीटर म्हणजे ५० टक्के गाळ काढण्याचे कंत्राट दिलेले आहे ! याचा अर्थ काय ? यावर्षी एवढा कमी गाळ कशासाठी काढला जातोय ? यामुळे मुंबईत पाणी तुंबण्याचे प्रकार वाढणार नाहीत काय ? काही कंत्राटदारांना गतवर्षीच दोन वर्षाची कामे देण्यात आली त्यामुळे तुलनात्मक यावर्षी गाळाची टक्केवारी कमी दिसते असे अतिरिक्त आयुक्तांनी या शिष्ठ मंडळांना सांगितले. मग गाळ कमी आणि पैसे ३२ कोटींनी अधिक कसे ? हि नालेसफाई आहे कि तिजोरीची सफाई असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी यावेळी केला. कट कमिशन ठरवले आणि प्रस्तावाला मंजुरी न देता सत्ताधारी फरार झाले. ज्या पद्धतीने कलानगर जंक्शनला पाणी तुंबत नाही त्या पद्धतीने मुंबईत कुठेही पाणी तुंबू नये अशी व्यवस्था आणि साफसफाई करा असा टोला आमदार अॅड. आशिष शेलार यांनी लगावला.