कीर्तनासाठी जात असताना इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात

जालना – किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर (Nivrutti maharaj deshmukh Indorikar) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास इंदोरीकर महाराज (Indorikar maharaj) यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ इजा झाली असल्याची माहिती आहे.

काल ते जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. यात चालक किरकोळ जखमी झाला. या अपघातात इंदोरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच परतुरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी शाम पांढरपोटे,नरेंद्र चव्हाण, दीपक खरात घटनास्थळावर दाखल झाले. जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉ.सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शामसुंदर शामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे.