‘काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी महाराष्ट्रात 5 टक्के जागा राखीव ठेवण्याचे फर्मान बाळासाहेबांनीच दिले होते’

मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. या सुरू असलेल्या वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला फटाकरलं आहे. 32 वर्षापूर्वीचा आक्रोश, इतिहास, वेदना त्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचं कौतुक केलं पाहिजे. या सिनेमात अनेक सत्य दडपली आहेत. ताश्कंद फाईल हा सिनेमा त्याच निर्मात्याकडून प्रसिद्ध झाला आणि लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं खापर एका कुटुंबावर फोडण्यात आलं. हा एक राजकीय अजेंडा या माध्यमातून राबवला जात आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

काश्मिरातील प्रश्नावर आणि काश्मिरी पंडितांच्या वेदनेवर सातत्याने आवाज उठवणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या काळातील एकमेव नेते होते. आम्ही आमच्या देशात निर्वासित झालोय. केंद्र सरकार आणि राज्यपालांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे. आमच्या मुलांचं शिक्षण होऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला शिक्षणात राखीव जागा द्या, अशी विनंती काश्मिरी पंडितांनी शिवसेना प्रमुखांकडे केली होती. त्यावेळी देशातील माझ्या हातात काही नाही. पण महाराष्ट्रात वैद्यकीय, इंजीनियरिंग क्षेत्रात तुम्हाला 5 टक्के जागा राखीव ठेवण्याचं फर्मान देतो. त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. शिवसेना प्रमुखांनी लगेच त्यांना फोन करून सांगितलं विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी महाराष्ट्रात 5 टक्के जागा राखीव ठेवा. तसा कायदा करून घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य होतं. त्यामुळे काश्मीरची वेदना जेवढी आम्हाला कळते तेवढी इतरांना कळत नाही, असंही ते म्हणाले.