राज ठाकरेंचे आदेश अन् मराठी माणसाची मनसे जागी झाली, IPLच्या बसेस फोडल्या !

मुंबई : हिंदुत्वाबरोबर मराठीचा मुद्दा लावून धरा, मराठी माणसाची मनसे मला पुन्हा दिसली पाहिजे, मराठीवर ठराविक नेत्यानेच न बोलता सर्वांनी बोला, शिवजयंती आणि गुढी पाडवा उत्सव उत्साहात साजरा करा, असे निर्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. त्यानुसारच आता मनसे पुन्हा एकदा भमीपूत्र आणि मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे.

परप्रांतीयांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेने एल्गार केला आहे. आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बसेसची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. दक्षिण मुंबईतील चर्चगेट भागात असलेल्या ताज हॉटेल बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी या बस फोडल्या.

बसवर ‘मनसेचा दणका’ असं लिहिलेले पोस्टर चिकटवून मनसेने बसची तोडफोड केली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.