राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी द्वेषात्मक भाषणांवर निर्बंध –  देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या भाषणांवर निर्बंध असून औरंगाबाद येथील प्रकरणात उपलब्ध सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे दोषींची शहानिशा करुनच पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी आज सांगितले.

औरंगाबाद येथे रामनवमीच्या दिवशी दोन समुदयांमध्ये झालेल्या वादासंदर्भातील सदस्य अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गृहमंत्री  फडणवीस बोलत होते. औरंगाबाद येथील किराडपुरा, या भागात रामनवमीच्या दिवशी दंगा करण्याच्या उद्देशाने कृती करणा-या आरोपींवर गुन्हा दाखल करताना पोलीसांनी त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे जमावाची शहानिशा करुन संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई केली असल्याचे सांगून गृहमंत्री म्हणाले की, उपलब्ध फुटेजच्या आधारे जेवढे आरोपी निष्पन्न झाले त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे.

राज्यात विद्वेष पसरवणारी भाषणे करण्यावर निर्बंध असून ज्यांनी यापूर्वी अशा प्रकारे भाषण केल्याची माहिती असेल त्यांना इतर भाषणाच्या वेळी लिखित सूचनेद्वारा, अशा प्रकारे भाषण करु नये याची पूर्वसूचना देण्यात आली असल्याचे ही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विधानसभा सदस्य अस्लम शेख, जितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला.