‘उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक संकट आली, पण आज मी त्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले’

मुंबई – शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह (sign) गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. शिवसेना हे नाव देखील आता दोन्ही गटांना वापरता येणार नाहीये. यानंतर आता ठाकरे गटाकडून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांना लक्ष्य केले जात आहे. यातच आता आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सारखं सारखं देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadanvis) नाव घेतात. कोणतीही प्रतिक्रिया द्यायची म्हटलं तरी देवेंद्र फडणवीस आणि मी… फडणवीस आणि मी… असंच बोलत असतात. कधीतरी तुम्ही स्वतः बोला… अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जाधव यांच्याकडून करण्यात आली आहे.

एवढंच नाही तर याही पुढे जाऊन ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा जप केला नाही तर यांना माहितीय, एकदा माइक खेचलाय, आता खुर्चीही खेचतील…असं म्हणत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक संकट आली. अनेक लोक तुटून पडले. पण आतापर्यंत ते खचले नव्हते. आज मी त्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले, हे योग्य नसल्याची खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.