भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकरांवर महत्वाची जबाबदारी 

BJP : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची टीम जाहीर केली आहे . नड्डा यांनी शनिवारी (२९ जुलै) पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. नड्डा यांच्या टीममध्ये नव्या-जुन्या चेहऱ्यांचा ताळमेळ बसवण्यात आला आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातील तिघांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यात राष्ट्रीय महामंत्री म्हणून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. तर राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विजया रहाटकर, पंकजा मुंडे (Vijaya Rahatkar, Pankaja Munde) यांचाही कार्यकारणीत समावेश करण्यात आला आहे. नुकतेच पंकजा मुंडे यांनी राजकारणापासून २ महिने बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना पुन्हा पक्षात सक्रीय होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता भाजपाच्या केंद्रीय पातळीवरून पंकजा मुंडे यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे.

यूपीच्या दोन खासदार रेखा वर्मा, लक्ष्मीकांत बाजपेयी आणि विधान परिषद सदस्य तारिक मन्सूर यांना केंद्रीय उपाध्यक्षांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनाही केंद्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे. संजय बंदी आणि सुनील बन्सल यांना राष्ट्रीय महामंत्री करण्यात आले आहे. संजय बंदी यांचा केंद्रीय संघात समावेश करून पक्षाने तेलंगणाला संदेश दिला आहे. कैलाश विजयवर्गीय, तरुण चुघ, विनोद तावडे, अरुण सिंग (Kailash Vijayvargiya, Tarun Chugh, Vinod Tawde, Arun Singh) यांना पुन्हा संधी मिळाली आहे. सर्वांना पुन्हा सरचिटणीस बनवण्यात आले आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते एके अँटनी यांचे पुत्र अरुण अँटनी यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अँटनी यांनी काही काळापूर्वी पक्षात प्रवेश केला होता. गोरखपूरचे माजी आमदार राधामोहन अग्रवाल यांना केंद्रीय संघात एंट्री देऊन यूपीच्या राजकारणात मोठा संदेश गेला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात आले नव्हते, मात्र आता त्यांना राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे प्रभारी सुनील देवधर यांना राष्ट्रीय संघातून वगळण्यात आले. सीटी रवी आणि दिलीप सैकिया यांनाही सरचिटणीस पदावरून हटवण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे खासदार आणि माजी सहकोषाध्यक्ष यांना हटवण्यात आले. त्यांच्या जागी नरेश बन्सल यांना सहकोषाध्यक्ष करण्यात आले आहे.