Breaking : वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले

नागपुर –  नागपुरातील वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर ईडीने धाड (ED Raid) टाकल्याची बातमी समोर आली आहे. गुरुवारी सकाळपासूनच उके यांच्या नागुपरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरु आहे. मात्र ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणात सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, आताच समोर आलेल्या माहितीनुसार सहा तासांच्या चौकशीनंतर आता ईडीने उके यांना ताब्यात घेतले आहे. ईडीने अजून अटक दाखवलेली नसली तरीही त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त पहायला मिळत आहे.

ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती. सतीश उके यांना हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखलं जातं. अनेक मोठ्या प्रकरणात त्यांनी युक्तिवाद केला आहे.