हिंदूंचा अपमान करणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारायला हवे; भाजपनेत्याची मागणी

नवी दिल्ली : माँ कालीच्या (Ma Kaali Movie Poster) वादग्रस्त पोस्टर प्रकरणी दिल्ली आणि यूपीमध्ये एफआयआर (FIR)दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने माँ काली पोस्टर प्रकरणी कलम 153A आणि 295A अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. दिल्ली पोलिसांना काली माँच्या पोस्टर वादाच्या दोन तक्रारी आल्या होत्या. एक तक्रार नवी दिल्ली आणि एक तक्रार IFSO ला देण्यात आली होती. IFSO युनिटने हे चित्र पोस्ट करणाऱ्या लीना मनिमेकलाई (Leena Manimekalai)यांच्या विरोधात IPC 153A आणि IPC 295A (कोणत्याही वर्गाच्या, धर्माच्या भावना भडकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, एका बाजूला या सर्व घडामोडी घडत असताना सिगारेट ओढणारी व हातात समलैंगिक समूहाचा झेंडा घेतल्याचे देवीचे रूप सादर करून हिंदूंचा अपमान करणाऱ्यांना फासावर लटकवायला हवे किंवा गोळ्या घालून ठार मारायला हवे, असे आवाहन करीत कर्नाटकमधील भाजपचे (BJP)नेते के. एस. ईश्‍वरप्पा (K. S. Eshwarappa)यांनी केले.

काली माता हे आमच्यासाठी श्रद्धेचे केंद्र आहे. ती म्हणजे शक्तीचे रूप आहे. भारतीय संस्कृतीचे ती प्रतीक आहे. अशा काली मातेचे सिगारेट ओढतानाचे पोस्टर प्रकाशित केल्याने देशभरातील हिंदू व्यक्ती संतप्त झाले आहेत. भाजपच्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा जगभरातील मुस्लिम समाज निषेध करीत आहे. त्याचप्रमाणे आमच्या देवदेवतांच्या अपमानाविरोधात आम्हीसुद्धा आवाज उठवू, असे ईश्‍वरप्पा म्हणाले.