काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशवारीला रवाना, जाणून घ्या आता ते कधी परतणार

नवी दिल्ली– पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)परदेशात गेले आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. परदेशातून त्यांचे 17 जुलै (रविवार) पुनरागमन होणार आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होणार असून ते ६ ऑगस्टला संपणार आहे. संसदेच्या या अधिवेशनात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची निवड होणार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलैला तर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आज (मंगळवारी) कतार एअरलाइन्सच्या विमानाने परदेशात गेले आहेत. देशातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व राजकीय घडामोडींवर जनतेच्या नजरा लागल्या आहेत. असे असताना गांधी नेमके कोणत्या कारणासाठी बाहेर गेले आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांना एनडीएकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यात आले आहे, तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा रिंगणात आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून उपाध्यक्षपदाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. 21 जुलै रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.