पंतप्रधान मोदींच्या आशिर्वादानेच एलआयसी, एसबीआयमधील जनतेचा पैसा बुडण्याची भिती : नाना पटोले

अदानी समूहातील गैरकारभाराची केंद्रातील मोदी सरकारने तातडीने चौकशी करावी.

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील  जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. तरीही केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. ‘अदानी’ समूहातील गैरकारभाराची चौकशी करावी व जनतेचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी एसबीआय व एलआयसीच्या राज्यातील सर्व कार्यालयांसमोर आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.(The Modi government at the center should immediately investigate the mismanagement in the Adani group.).

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ट संबंध जगजाहीर आहेत. या संबंधातूनच सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांनी जनतेच्या कष्टाचा पैसा अदानीच्या उद्योग समुहात कसलाही विचार न करता गुंतवला आहे. विमानतळ, रेल्वे, वीजसेवा, रस्ते, बंदरे यासह देशातील सर्व महत्वाचे सरकारी उद्योग अदानींच्या घशात घातलेले आहेत. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक व सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी मधील जनतेचा पैसाही अदानीच्या खिशात घातला आहे. अदानीच्या गैरकारभाराचा फुगा आता फुटला असून लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, हा पैसा जनतेचा आहे. एवढा मोठा घोटाळा होऊनही मोदी सरकार, पंतप्रधान आणि अर्थमंत्री गप्प आहेत हे अतिशय लाजीरवाणे व असंवेनशीलपणाचे लक्षण आहे.

काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही पण सर्व नियम, कायदे मोडून एखाद्या उद्योगपतीसाठी रान मोकळे करणे हे देशाच्या हिताचे नाही. मा. खा. राहुलजी गांधी यांनी सातत्याने अदानीसंदर्भात धोक्याची जाणीव करुन दिली होती. महिनाभरापूर्वीच राहुलजी यांनी अदानीचा फुगा फुटेल असे सांगितले होते तरीही मोदी सरकार जागे झाले नाही, आता घोटाळा उघड झाला आहे. काँग्रेस पक्षासह विरोधपक्ष या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत आहेत मात्र मोदी सरकार चौकशीही करत नाही व काही उत्तरही देत नाही.

संसदेत काँग्रेस पक्ष सामान्य जनतेचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी आवाज उठवत आहेच पण रस्त्यावर उतरुनही जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहे. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राज्यातील सर्व कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार, विविध सेलचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असे नाना पटोले म्हणाले.