उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांची नाव बुडाली, दिगंबर कामत यांचा दणदणीत विजय

पणजी : मडगावात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत विजयी झाले आहेत. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा कामतांनी दारुण पराभव केला आहे. मोठ्या मताधिक्याने दिगंबर कामतांना विजय मिळाला असला तरीही बाबू आजगावकरांनी कामतांसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं.

मडगाव हा दक्षिण गोव्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक मानला जातो. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिगंबर कामत यांनी 12105 मतं मिळवत भाजपच्या शर्मद रायतूरकर यांचा 4176 मतांनी पराभव केला होता. तर 2012 साली दिगंबर कामतांनी भाजपच्या रुपेश महात्मे यांचा 4452 मतांनी पराभव केला होता. कामतांना 2012 मध्ये 12041 मतं मिळाली होती.

यावेळी उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांना दिगंबर कामतांच्या विरोधात उभे करून भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. यापूर्वी कधी केला नसेल एवढा मोठ्या प्रमाणात कामत यांनी प्रचार केला. केवळ 15 दिवसांत बाबू आजगावकर यांनी पूर्ण मडगाव मतदारसंघ पिंजून काढला होता.