How’s The Josh : म्हापशातून भाजपच्या जोशुआ डिसुझाची विजयाच्या दिशेने वाटचाल

पणजी : देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, 3 राज्यांमध्ये भाजपने आघाडी कायम ठेवली आहे. गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजप सध्या १७ जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात सर्वात जास्त चर्चेत असणारी जागा म्हणजे म्हापसा विधानसभा मतदारसंघाची. या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते फ्रान्सिस डिसुझा यांचे पुत्र जोशुआ डिसुझा हे निवडणूक लढवत होते.

आता या जागेवरून जोशुआ निर्णायक आघाडी घेताना दिसत आहेत. आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये जोशुआ १७२५ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात भाजपमधून काँग्रेसवासी झालेले सुधीर कांदोळकर हे निवडणूक लढवत होते. तर, जोशुआ यांनी घेतलेली ही आघाडी पाहता हे कल आता शेवटपर्यंत राहून जोशुआ डिसुझा विजयाच्या उंबरठयावर पोहचले आहेत.

दरम्यान, २०१९ साली फ्रान्सिस डिसुझा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देखील जोशुआ यांनी बाजी मारली होती. जोशुआ डिसुझा विरुद्ध सर्वपक्षीय नेते एकवटले होते. जोशुआ हे अत्यंत तरुण असे नेते आहेत. जोशुआ यांचे वय अवघे ३३ वर्षे आहे.