युरोपमध्ये युद्ध व्हावं अशी रशियाची इच्छा आहे का? पुतीन म्हणाले…

नवी दिल्ली – युरोपमध्ये युद्ध व्हावं अशी रशियाची इच्छा नाही असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. युक्रेनमधून सैन्य मागं घेण्याच्या घोषणेनंतर पुतीन यांनी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत पुतीन बोलत होते.

पश्चिमेकडील देशांसोबत राजनैतिक चर्चा करुन हा प्रश्न सोडवण्याचं आवाहन पुतीन यांनी केलं. अमेरिका आणि नाटो देशांसोबत विश्वासपूर्ण संबंध स्थापन करण्यासाठी चर्चा करायला रशिया तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. रशियाची ही घोषणा सावध आशावाद बाळगण्यासाठी पुरेशी असली तरी सैन्यमाघारीचे प्रत्यक्ष घटनास्थळावरचे पुरावे अजून निदर्शनास आले नाहीत असं नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोटेनबर्ग यांनी म्हटलं आहे.

मात्र गेल्या दोन दिवसात रशियाकडून मिळत असलेले संकेत स्वागतार्ह आहेत असं सांगून रशिया या प्रश्नावर राजनैतिक तोडगा शोधत असेल परंतु ते त्यांच्या कृतीतून दिसून येणं आवश्यक आहे असं नाटोच्या सरचिटणीसांनी सांगितलं. रशियानं काल सकाळी युक्रेनच्या सीमेवरुन काही सैनिक तुकड्या आपल्या तळावर परतत असल्याचं जाहीर केलं होतं.