शिवसेच्या आमदाराचे जात प्रमाणपत्र अवैध! राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने केली होती तक्रार

जळगाव : चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती (नंदुरबार) यांनी दिला आहे. आमदार सोनवणे यांनी सादर केलेले उपविभागीय अधिकारी (अमळनेर) यांनी निर्गमित केलेले टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचेदेखील समितीने आदेश केले आहेत.

या प्रकरणासंदर्भात चोपड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी तक्रार केली होती. दरम्यान, या निकालाविरोधात आमदार सोनवणे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.आमदार लता सोनवणे यांचा टोकरे कोळी अनुसूचित जमातीचा दाखला निवडणुकीच्या प्रयोजनार्थ 10 एप्रिल 2019 रोजी जात पडताळणी समितीला सादर केला होता.

आमदार सोनवणे यांचा अनुसूचित जमातीचा दावा 4 नोव्हेंबर 2020 रोजीच्या न्यायालयाच्या विस्तृत आदेशान्वये जात पडताळणी समितीने अवैध घोषित केला होता. समितीच्या अवैध आदेशाविरुद्ध आमदार सोनवणे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.