येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्णयाची वाट बघत बसू नका; तयारीला लागा – अजित पवार

शिर्डी – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेले कार्यकर्तेच पक्षाला ताकद देतात त्यातून आमदार, खासदार तयार होतात. हेच लोक लोकसभा, विधानसभा निवडणुकीची वाट सोपी करणारे आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या विचारांची माणसे निवडून आणावी असे सांगतानाच पक्षाकडून निर्णय येईल याची वाट बघत बसू नका. निर्णय येईल तेव्हा येईल तोपर्यंत स्वतंत्र लढायचं आहे त्यादृष्टीने कामाला लागा असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी केले.

राष्ट्रवादीच्या मंथन शिबीरात स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी शिंदेसरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्ला केला.लोकशाही व्यवस्थेला नख लावण्याचे काम होतेय परंतु ते कधीही यशस्वी होणार नाही. सर्व निवडणुका वेळेत होणे आवश्यक आहे परंतु निवडणूकांना विलंब लावला जात आहे हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. निवडणूका वेळेत होणे याकडे राज्य निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे त्यांची ती जबाबदारी आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ हे ब्रीद वाक्य घेऊन आपण हे शिबीर करत आहोत. येणाऱ्या भविष्यात पक्षाने काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे, कोणत्या पध्दतीने काम केले पाहिजे. पक्षाची पुढची वाटचाल ठरवण्यासाठी हे शिबीर असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

सत्तेच्या माध्यमातून लोकांच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. फेब्रुवारी २०२३ मध्ये पाच निवडणूका होत आहेत. याबाबत सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन चर्चा करण्यात आली आहे. या निवडणूका आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत. या पाचही जागा आघाडीच्या कशा येतील त्यासाठी जीवाचे रान केले पाहिजे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.