Breaking : उदय सामंतांवरील हल्ला प्रकरणात थोरात, मोरेंसह पाचजणांना पोलीस कोठडी

पुणे : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेत मोठे वादळ निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस शिंदे गटाला ठाकरे गटातील नेते जाऊन मिळत असल्याने हा संघर्ष आणखी वाढला असून मुद्द्यांची लढाई आता गुद्द्यांवर आली आहे. यातच काल शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्या प्रकरणी मुख्य आयोजक संभाजी थोरवे (Sambhaji Thorve) यांना अटक केली आहे. राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांनाही अटक केली असून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, उदय सामंत (Uday Samant) यांच्यावरील हल्ला प्रकरणात शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात (Baban Thorat) तसेच शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे (Sanjay More) यांच्यासह पाच जणांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणी आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.

बबन थोरात हे हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख आहेत. आमदार सावंत यांच्यावरील हल्ल्यात ते प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. मात्र, दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यात बोलताना त्यांनी शिवसैनिकांना चिथावणक्ष मिळेल, अशी भाषा वापरली होती. बंडखोरांच्या गाड्या फोडा मोतोश्रीवर नेऊन उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हस्ते सन्मान करतो, अशा स्वरूपाचे विधान थोरात यांनी केले होते. त्यामुळे थोरात यांनी राज्यातील शिवसैनिकांना दिलेल्या चिथावणीतून पुण्यातला आमदार सामंत यांच्यावरील हल्ल्याचा प्रकार झाल्याचा आरोप ठेऊन थोरात यांनाही अटक करण्यात आली आहे.