छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहणारा भाग्यशालीच : रमेश बैस

सहा दिवसात छत्रपतींचं तिकीट काढण्याचा रेकॉर्ड केल्याचं समाधान  : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे सामर्थ्य प्रचंड होते. आपण स्वत:ला भाग्यशाली समजतो की आपण सर्व छत्रपतींच्या महाराष्ट्राचे निवासी आहोत, असे गौरवोदगार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Maharashtra Governor Ramesh Bais) यांनी आज काढले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सांस्कृतिक विभागातर्फे विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.  राजभवन मुबंई येथील आयोजित या कार्यक्रमाची  राष्ट्रगित आणि राज्यगिताने  सुरुवात झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुंबईच्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, आदी उपस्थित होते. यावेळी विशेष टपाल  तिकिटाचे अनावरण  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या टपाल  तिकिटा साठी  सहकार्य करणाऱ्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे, प्रवीण मोहिते, सुनिल कदम, चतूर निमकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

आपल्या भाषणात राज्यपाल बैस यांनी सांस्कृतिक विभाग आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शिवराज्याभिषेक सोहळा यशस्वी करून दाखविल्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले. महाराजांनी आपल्या काळात समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला, असे राज्यपाल श्री बैस म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अभूतपूर्व असेच आहे असे नमूद केले. त्यामुळे रयतेच्या राज्याचा रोज राज्याभिषेक केला तरीही कमीच आहे. तिकिटाच्या माध्यमातून छत्रपतींना शासनाने वंदन केले आहे. गडकोट किल्ल्यांचे जतन सरकार करणार आहे, असे ते म्हणाले. जगदंबा तलवार, वाघनखं परत आणण्यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. त्यामुळे जगदंबा तलावार आणि वाघनखं नक्कीच परत येतील असा विश्वास आहे असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवाजी महाराज युगपुरुष असल्याचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतही काही लोक वाद निर्माण करीत आहेत. त्यांना त्यांचेच नेते शरद पवार यांनी उत्तर दिलेय. त्यासंदर्भातील ३५० वा राज्यभिषेक असा हॅशटॅगही वापरला आहे, असे फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य सरकार काम करीत असल्याचे ते यावेळी म्हणाले.