लोकसहभागाशिवाय सरकारी शिक्षणाचा दर्जा सुधारू शकत नाही – सत्यजीत तांबे

अकोले – लोकांची कामं सरकारने करणं, ही अपेक्षा योग्य आहे. पण एखादी शाळा सरकारी मदतीविना बंद पडत असेल, तर लोकांनीच ती सुरू ठेवण्यासाठी पुढाकार घ्यायचा असतो. तुमच्या गावातील सूज्ञ लोकांनी हे प्रत्यक्षात करून दाखवलं. त्यामुळे तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. लोकसहभागाशिवाय सरकारी शिक्षणाचा दर्जा सुधारू शकत नाही हे लक्षात ठेवा, असं परखड मत आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी व्यक्त केलं. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उंचखडक या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झेंडावंदन केल्यानंतर ते बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक हे गाव त्याच्या नावामुळेच लक्ष वेधून घेतं. या गावातील जिल्हा परिषदेची शाळा विद्यार्थी आणि सरकारी मदत यांच्याअभावी बंद पडली होती. पण आपल्या पाल्यांच्या भवितव्याची गरज ओळखून गावातील लोक एकत्र आले. त्यांनी लोकसहभागातून केवळ एका महिन्यात ही बंद पडलेली शाळा पुनरुज्जीवीत केली. महिन्याभरापूर्वी ज्या शाळेत चार-पाच विद्यार्थी नव्हते, तिथे आता ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे शाळेने डिजिटल क्लासरूमचंही उद्घाटन केलं.

या शाळेच्या ध्वजवंदनासाठी आमदार सत्यजीत तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. उंचखडक गावच्या लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. सगळीच कामं सरकारने करावी, अशी आपली अपेक्षा असते. पण शिक्षणासारख्या क्षेत्रात सरकार कुठे कमी पडत असेल, तर आपणच एकत्र येऊन मार्ग काढायला हवा, ही बाब तुम्ही ओळखली आणि त्याप्रमाणे कृती केलीत, याचा मला अभिमान आहे, अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.

भारतात आणि राज्यात ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या शाळांची भूमिका खूप मोठी आहे. पण लोकसहभागाशिवाय सरकारी शिक्षणाचा दर्जा अजिबात सुधारणार नाही, ही बाब लोकांनी लक्षात घ्यायला हवी. तुम्ही केलेलं काम खरंच दिशादर्शक आहे. त्यामुळे तुमचं अभिनंदन करण्यासाठी मी इथे आलो. या शाळेतून शिकून मोठ्या झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही शाळा त्याच्या आसपासच्या लोकांनी कष्टाने उभी केली, हे सांगताना नक्कीच अभिमान वाटेल, असंही ते म्हणाले. या गावाकडून इतरही गावं प्रेरणा घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.