काका पुतणे जर एकत्रच असतील तर महाराष्ट्र समोर वेगळी भूमिका कशासाठी? – संभाजी ब्रिगेड

Pune – शरद पवार (Sharad Pawar) सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळेल असं भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्टींकडून अजित पवारांना सांगण्यात आल्याचा दावा विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार (Opposition leader Vijay Vaddetiwar) यांनी केला आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना वड्डेटीवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) भाजपाच्या सांगण्यावरुन शरद पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही म्हटलं आहे.

2 प्रमुख पक्ष पडूनही भाजपाची परिस्थिती सुधारत नसल्यामुळे अजित दादा हे शरद पवार यांना भेटत आहे. लोकनेतृत्व असलेले शरद पवार यांची गरज भाजपाला आहे. त्यांची मदत मिळाल्याशिवाय लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही. त्यामुळे अजित दादाच्या शरद पवार यांना भेटत आहे, असं वड्डेटीवार म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना अट घातली आहे की शरद पवार आल्याशिवाय तुम्हाला मुख्यमंत्री होता येणार नाही. म्हणूनच अजितदादा मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांना वारंवार भेटून सोबत येण्यास आग्रह करत आहेत, असं वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.

या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मा. पवार साहेबांचे राजकारण महाराष्ट्राला संभ्रमात टाकणार आहे. ह्या अशा भेटी-गाटीमुळे विश्वासाहर्ता संपत चालली आहे. याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. किहीही केलं तरी अजित पवार आता शरद पवारांचे राहिले नाहीत, हे शरद पवार ठाम सांगू शकत नाहीत. मोदी वॉशिंग पावडर मध्ये सगळे स्वच्छ धुतले जात आहे.

स्वतःचे नाती-गोती सांभाळण्याच्या नादात कार्यकर्त्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे. काका पुतणे जर एकत्रच असतील तर महाराष्ट्र समोर वेगळी भूमिका कशासाठी? मा. पवार साहेब भाजपला सहकार्य करणार आहेत की विरोध करणार आहेत हे एकदा त्यांनी जाहीर केलं पाहिजे. 50 खोके एकदम OK चा प्रवास आता वेगळ्या दिशेने चाललाय. नेते गप्प आहेत, जनता संभ्रमात आहे. महाराष्ट्रात INDIA आघाडीचं काय होणार? हे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सर्वांनी वॉशिंग मशीनच्या विरोधात लढाले पाहिजे असं संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.