मी ग्रेट लीडर… आमदार, भावी मुख्यमंत्री अन् भावी पंतप्रधानही होईल : रुपाली पाटील-ठोंबरे

पुणे : मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या पुण्यातील आक्रमक नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) या सोशल मिडीयावर चांगल्याच सक्रीय असतात. मात्र अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते.  मात्र आता त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांविरोधात पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, रुपाली पाटील-ठोंबरे यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 कार्यकर्त्यांविरोधात पुण्यातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवर एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांचा ग्रुप तयार करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत बदनामी करण्यात आली. त्यानंतर रूपाली पाटील या आक्रमक झाल्या आहेत.

कायदेशीर कारवाई करूनही जर ट्रोलर ऐकत नसतील तर त्यांना जशास तसं उत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तसेच ट्रोल केल्याने मला फरक पडत नाही. मी ग्रेट लीडर आहे. दमदार आणि स्वतःच संरक्षण करणारी लीडर आहे. येणाऱ्या काळात मी आमदार होईल , भावी मुख्यमंत्री अन् भावी पंतप्रधानही होईल असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रुपाली पाटील म्हणाल्या, मनसेतील नेत्यांच्या आशीर्वादानेच मला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मी माझ्या कामामुळे फेसबुकवर प्रसिद्ध आहे. त्याचाच त्रास मनसेच्या कार्यकर्त्यांना होतो. त्यामुळे मला अशाप्रकारे पातळी सोडून ट्रोल केलं जातं. मनसेत महिला कुठे आहेत. काम करून फेसबुकवर टाकणारी महिला मीच होते. मी पक्ष सोडला ते त्यांना पचनी पडत नाही, त्याचा त्यांना त्रास होतो आणि त्यामुळेच मला फेसबुक अध्यक्षा म्हटलं जातं, परंतु अशाप्रकारे हिनवल्यामुळे मला काहीही फरक पडत नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.