गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का? बावनकुळेंचा ठाकरेंना थेट सवाल

मुंबई – काल मुंबईत शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावरही सडकून टीका केली. भाजपमध्ये उपऱ्यांचा बाजार भरला आहे. त्यामुळे भाजपमध्ये ओरिजीनल कोण हेच कळत नाही. एवढे उपरे घेतले आहेत की तुमचा बावनकुळे की एकसे बावनकुळे हेच कळत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

दरम्यान, आता या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही. गरीब शेतकऱ्याच्या (Farmer) पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का? माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे.

भाजपामुळे (BJP) विधानसभा निवडणूक जिंकल्यावर मा. उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू. तयार राहा. अमित भाईंवर टीका करण्यापूर्वी उद्धवराव आधी स्वतःला सांभाळा. विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते आधी पाहा.