रशियावर निर्बंध लादल्यामुळे अन्नधान्याच्या किमती खूप वाढतील – पुतीन

नवी दिल्ली – रशियावर निर्बंध लादल्यामुळे जगातली अन्न आणि उर्जा बाजारपेठ विस्कळीत होईल असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. रशिया जगातला प्रमुख खत उत्पादक देश आहे. त्यामुळे या निर्बंधाचा परिणाम म्हणून अन्नधान्याच्या किमती खूप वाढतील असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातली युद्धबंदीबाबतची चर्चा निष्फळ ठरली आहे.

दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच टर्कीमध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली. रशियाचे परराष्ट्रमंत्री युक्रेनबाबतच्या जुन्याच मतांवर ठाम आहेत असा आरोप करुन तरीही आम्ही रशियाबरोबर पुन्हा चर्चा करण्यास तयार आहे असं युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं आहे. रशियासुद्धा चर्चेला तयार आहे आणि पुतीन झेलेन्स्की यांना भेटण्यास नकार देणार नाहीत असा विश्वास रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लारोव्ह यांनी व्यक्त केला.

दुसऱ्या बाजूला तुर्कीने दोन्ही राष्ट्रांमध्ये मध्यस्थी करण्याचा निर्णय घेऊन त्रिपक्षीय स्वरूपात चर्चा केली जाईल असं सांगितलं. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी आशा व्यक्त केली आहे की चर्चेमुळे शोकांतिका टाळता येईल आणि युद्धविरामावर सहमती होण्यास मदत होईल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांचे तुर्की समकक्ष यांनी ६ मार्च रोजी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यांच्या चर्चेदरम्यान, एर्दोगन यांनी एकत्रितपणे शांततेचा मार्ग अवलंबण्याचा आणि समस्यांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी चर्चा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला.