जलील यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादीत यावं, पवार साहेब त्यांना नक्की पक्षात घेतील – भुजबळ

मुंबई – राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे.

भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय. एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रस्तावावर विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आघाडीसाठी अनुकुलता दर्शविली आहे. दरम्यान, ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनीच पक्षाचा राजीनामा देऊन यावं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणं काम करावं. शरद पवार (Sharad Pawar) साहेब त्यांना नक्की घेतील, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. ते लासलगाव जवळील निफाड तालुक्यातील विंचूर येथे बोलत होते.

‘एमआयएम’ला भाजपची ‘बी’ टी म्हणतात. त्यामुळे त्यांची महाविकास आघाडीसोबत घेण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिला. खरे तर इम्तियाज जलील हे ‘एमआयएम’चा राजीनामा देऊन आले, तर त्यांना घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी यावं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणं काम करावं. नक्कीच पवार साहेब त्यांना राष्ट्रवादीत घेतील, असे आवाहन भुजबळ यांनी केले.