Jasprit Bumrah | ‘एक वर्षापूर्वी हेच लोक म्हणत होते माझी कारकीर्द संपली, आता…’, बुमराहचे टीकाकारांना प्रत्युत्तर

टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळवून देणाऱ्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टीकाकारांवर निशाणा साधला आहे. तो म्हणतो की एक वर्षापूर्वीपर्यंत लोक त्याच्या करिअरच्या समाप्तीबद्दल बोलत होते आणि आता ते त्याला सर्वोत्कृष्ट म्हणतात. 2022 मध्ये बुमराहच्या पाठीच्या खालच्या भागात ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’ची शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे तो 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकात खेळू शकला नाही. तो जवळपास एक वर्ष क्रिकेटपासून दूर होता. तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याच्या त्याच्या क्षमतेवर लोक शंका घेऊ लागले. बुमराहने 2023 मध्ये पुनरागमन केले आणि त्यानंतर आशिया कप, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला. आता तो टी20 विश्वचषकातही टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

बुमराहने टीकाकारांना लक्ष्य केले
गेल्या एका वर्षात बुमराहने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 67 विकेट्स घेत टीकाकारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या टी20 विश्वचषकातील कमी धावसंख्येच्या सामन्यात 14 धावा देऊन आणि तीन विकेट घेऊन तो सामनावीर ठरला. त्याच्या पुनरागमनाच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांवर निशाणा साधत बुमराह म्हणाला, ‘एक वर्षापूर्वी हेच लोक म्हणत होते की मी पुन्हा खेळू शकणार नाही आणि माझी कारकीर्द संपली आहे. आता तेच मला सर्वोत्कृष्ट सांगत आहे.’

बुमराह इतकी चांगली गोलंदाजी कसा करतो?
बुमराह (Jasprit Bumrah) म्हणाला, ‘सामन्यात मी माझ्या क्षमतेनुसार गोलंदाजी करतोय की नाही याकडे मी लक्ष देत नाही, तर मी सामन्याच्या सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष देतो आणि त्यानुसार गोलंदाजी करतो. मला माहित आहे की प्रत्येकजण हेच उत्तर देतो, परंतु हे सत्य आहे. पाकिस्तानविरुद्धही अशा विकेटवर कोणती गोलंदाजी चांगली होऊ शकते, यावर लक्ष केंद्रित करण्याचा माझा प्रयत्न होता. मी फलंदाजांना फटके मारणे किती कठीण करू शकतो? माझ्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणते आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत असताना मी सध्याच्या परिस्थितीत राहण्याचा प्रयत्न करतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप