‘राष्ट्रवादीमध्ये मला सन्मानाने आमदारकी दिलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा त्याग करण्याचा प्रश्नच नाही’

जळगाव – भाजपमधून (BJP) नुकतेच राष्ट्रवादीत (NCP) गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. त्यातच, खडसेंच्या सुनबाई आणि भाजप खासदार रक्षा खडसेंनी केलेल्या एका विधानाचीही चर्चा होत आहे. एकनाथ खडसेंची अमित शाहांसोबत फोनवरुन चर्चा झाल्याचं रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) माध्यमांना सांगितलं. मात्र, या चर्चेमागचं कारण न सांगितल्याने निश्चितच खडसे-शाहांमधील चर्चेबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

यातच आता राष्ट्रवादीची साथ सोडून खडसे भाजपमध्ये पुन्हा जाऊ शकतात अश्या देखील बातम्या आज सकाळपासून येत आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी स्वतः यावर स्पष्टीकरण दिले आहे. अमित शहा यांची मी भेट घेतलेली नाही. मी अमित शहांना फोन केला होता फोनवर चर्चा झाली. ही चर्चा काही वैयक्तिगत कारणांनिमित्त होती. या भेटीबाबत शरद पवार यांना माहिती दिलेली होती’ असा खुलासा खडसे यांनी केला आहे.

भारतीय जनता पार्टीमध्ये मी अनेक वर्ष मेहनतीने काम केलं होतं, मात्र, भाजपमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाली. अनेक खोट्या केसेस माझ्यावर लादण्यात आल्या त्यामुळे मी भाजप सोडलेला आहे. राष्ट्रवादीमध्ये मला सन्मानाने आमदारकी दिलेली आहे. भाजपमधून मी बाहेर गेलो होतो मात्र मला राष्ट्रवादीने मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीचा त्याग करण्याचा प्रश्नच नाही, असं खडसेंनी स्पष्ट केलं.