‘रंग अन् वजनावरुन अर्पिताला हिणवतात’, सलमानचा मेहुणा आयुष शर्मा ट्रोलर्सवर भडकला

बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा (Aayush Sharma) चांगलाच भडकला आहे. आयुषने पत्नी अर्पिता खान शर्माला (Arpita Khan) तिची काळी त्वचा आणि वाढलेले वजन यासाठी ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे. आयुषने अर्पिताच्या काळ्या रंगाची खिल्ली उडवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून त्याला त्याच्या पत्नीवर अभिमान आहे आणि तिला तिचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायचे आहे, असे म्हटले आहे.

आयुष शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो ‘टीईडीएक्स प्लॅटफॉर्म’वर बोलत आहे. आयुष या व्हिडिओमध्ये सांगतो की, त्याची पत्नी अर्पिता खानला पब्लिक फिगर म्हणून खूप टार्गेट केले जाते. जेव्हा ती ऑनलाइन जाते, कोणताही फोटो अपलोड करते तेव्हा लोक तिची खिल्ली उडवतात. अर्पिताला तिच्या काळ्या रंगामुळे आणि जास्त वजनामुळे टोमणे मारले जातात.

व्हिडिओमध्ये आयुष म्हणतो, ‘माझ्या पत्नीला तिच्या वाढलेल्या वजनामुळे सतत ट्रोल केले जाते. या लोकांना वाटते की ती एक सेलिब्रिटी आहे, त्यामुळे तिने इतके लठ्ठ नसावे. तिचा रंग काळा का आहे? अर्पिताने सेलिब्रिटीसारखे डिझायनर कपडे घालावेत. ती जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर टाकते तेव्हा लोक लगेच तिला तिच्या काळ्या त्वचेची आठवण करून देतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. अर्पिता जशीही आहे मला तिचा अभिमान आहे.’

आयुष पुढे म्हणतो, ‘आजच्या जगात आंतरिक सौंदर्याचा आदर नाही. आपण किती चांगले व्यक्ती आहात हे कोणालाही जाणून घ्यायचे नाही. लोकांना फक्त बाह्य सौंदर्याची काळजी असते आणि त्यांना तेच पहायचे असते. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे कारण ती तिच्या रंगावरुन कधीच स्वत:ची अवहेलना करत नाही. अशा ट्रोलर्सना तिने कधीही आपल्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही. अर्पिता स्वतःच्या अटीवर आयुष्य जगते.’

‘मी सेलिब्रिटी नाही. मी असे होण्यासाठी काहीही केलेले नाही. मला कधीही कॅमेऱ्यासमोर जायचे नाही. म्हणूनच मी जे आहे तेच आहे. मला आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचे आहे,’ असे अर्पिता नेहमी म्हणत असते असे आयुषने सांगितले.