कृष्णदेवराय : भारतातील विजयनगर साम्राज्याचा कर्ता-करविता

कृष्णदेवराय (Krishnadevaraya) या सामर्थ्यवान, तसंच दूरदृष्टी असणाऱ्या सम्राटामुळे दक्षिण भारतातल्या विजयनगर साम्राज्याने (Vijayanagar Empire) सोळाव्या शतकात सुवर्णकाळ अनुभवला असं म्हटलं जातं. आपल्या राज्याच्या विरोधात असणाऱ्या शत्रूंचा बीमोड करून त्याने साम्राज्यविस्तारही केला. त्याचबरोबर जलनियोजन, साम्राज्याचा विधायक आर्थिक विकास आणि काव्यशास्त्र विनोदाला दिलेलं उत्तेजन यांमुळे कृष्णदेवराय (Krishnadevaraya) हा एक ‘संपूर्ण सम्राट’ ठरला.

इ.स. १५०९ साली वयाच्या विसाव्या वर्षीच विजयनगरची नेतृत्वधुरा कृष्णदेवरायाला स्वीकारावी लागली. हे तरुण, अननुभवी नेतृत्व बघून अनेकांनी विजयनगरवर स्वारी केली. मांडलिक राजांनी साम्राज्यातून फुटून निघण्याचा प्रयत्न केला. या अवघड प्रसंगात कृष्णदेवरायने आपल्या शौर्य व युद्धनीतीचा परिचय सर्वांना दिला व साम्राज्य अबाधित ठेवलं.

ते सिंहासनावर आरूढ झाले तेव्हा दक्षिण भारतातील राजकीय परिस्थिती गोंधळात होती. पोर्तुगीज पश्चिम किनाऱ्यावर आले होते. कांचीच्या आसपासचा प्रदेश उत्तमत्तूर राजाच्या ताब्यात होता. ओरिसाच्या गजपती राजाने उदयगिरीपासून नेल्लोरपर्यंत प्रांत विलीन केला होता. बहमनी राज्य संधी मिळताच विजयनगरावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. कृष्णदेवरायांनी या परिस्थितीचा चांगला सामना केला.

राज्यकारभारातलं उत्कृष्ट नियोजनही कृष्णदेवरायाने दाखवून दिलं. पोर्तुगिजांशी त्याचे चांगले संबंध होते. त्यांच्या कसबीपणाचा उपयोग करून त्याने अनेक सुधारणा घडवून आणल्या. तुंगभद्रेवर मोठं धरण बांधलं, कालवे काढले, तळी निर्माण केली. स्वतः धार्मिक व विष्णुभक्त असल्याने मंदिरकलेला प्रोत्साहन दिलं. राज्यातल्या कलाकुसरीच्या वस्तूंना मोठी बाजारपेठही मिळवून दिली.

कृष्णदेवराय स्वतः कवी-लेखक होता. जांबवती-परिणय, सकलकथासारसंग्रहम्, मदालसाचरित्र, सत्यवधु-परिणय हे ग्रंथ त्याने संस्कृतमध्ये लिहिले. तेलगूतील ‘आमुक्तमालपदा’ हे त्याने लिहिलेलं काव्य लोकप्रिय ठरलं. तेलगूतल्या (Telugu) पाच महाकाव्यांमध्ये त्याचा समावेश होतो. त्याने समीक्षण केल्याचीही नोंद आढळते.

कृष्णा नदीपासून रामेश्वरपर्यंत, पश्चिम समुद्रापासून ओरिसापर्यंत साम्राज्य नेणारा, राज्यात आर्थिक स्थैर्य आणणारा, साहित्य व कलांना उत्तेजन देणारा असा हा राजा होता. त्याला केवळ ४० वर्षांचं आयुष्य लाभलं. तो दीर्घायुषी ठरला असता तर भारताच्या इतिहासाला (History of India) कदाचित वेगळं वळण लागलं असतं.