महाराणा प्रताप : मोगलांशी झुंजलेला महाप्रतापी, दूरदर्शी आणि स्वाभिमानी राजा

मोगलांपुढे शरणागती न पत्करता अखेरपर्यंत झुंज देणारा राजपूत राजा (Rajput king) असं राणा प्रतापचं इतिहासात महत्त्वाचं स्थान आहे. ९ मे १५४० या दिवशी राणा प्रतापचा (Rana Pratap) जन्म झाला. वयाच्या ३२ व्या वर्षी त्याच्या मामाने त्याला राजगादीवर बसवलं.

राणा प्रतापच्या हाती सत्तासूत्रं आली तेव्हा राजपुतान्यात मोगल वर्चस्व वाढलेलं होतं. मेवाडचा केवळ अरवली पर्वताचा भागच राणा प्रतापच्या हाती उरलेला होता. सम्राट अकबरने साम, दाम, दंड, भेद अशी सर्व आयुधं वापरून राजपूत राजांना एकापाठोपाठ एक अंकित करण्याचा सपाटा लावला होता. राजपूत राजेही युद्ध नाकारून अकबराचे मांडलिक होत होते, अशा काळात राणा प्रतापचं स्वाभिमानी, लढवय्या नेतृत्व राजपुतांना लाभलं. राणा प्रताप सत्तेवर येण्यापूर्वीच चितोड ही मेवाडची राजधानी मोगलांच्या ताब्यात गेली होती. ती परत मिळवण्यासाठी राणा प्रतापने अनेक प्रकारे युद्ध खेळलं. गोगुंड या ठिकाणी आपली राजधानी नेली. किल्लेबांधणीवर विशेष लक्ष दिलं. अशा मजबूत, अवघड किल्ल्यांची कोठारं शस्त्रं-धान्यांनी भरून टाकली. गनिमी काव्याचा उपयोग करून अकबराच्या सैन्याला सळो की पळो करून सोडलं.

इ.स. १५७६ साली झालेली हळदीघाटची लढाई (Battle of Haldighati) अतिशय मोठी लढाई ठरली. अकबराचे दोन सरदार मानसिंह व आसफखान आणि राणा प्रताप यांच्यात ही लढाई झाली. या युद्धात राणा प्रताप पराभूत झाला. यानंतर तो अज्ञातवासात होता. काही वर्षांनी पुन्हा एकदा गनिमी काव्याचा (Ganimee Kawa) वापर करून मोगल सैन्याला पळता भुई थोडी केली. यामुळे खुद्द अकबराने त्याच्यावर स्वारी केली. पण त्याला अपयश आलं. या काळात राणा प्रतापने मोगलांच्या ताब्यातले आपले सर्व किल्ले परत मिळवले. चितोड मात्र त्याला मिळवता आलं नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात सुमारे एक तपभर त्याने शांततेत राज्य केलं. १९ जानेवारी १५९७ रोजी वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी त्याचं निधन झालं. अत्यंत संघर्षमय, तेजस्वी जीवनाची ही अखेर होती.