लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम, ‘या’ पक्षात जाहीर प्रवेश

Surekha Punekar Joins BRS: जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, तसतशी भाजपामधील इनकमिंग वाढताना दिसत आहे. खासकरुन मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा भाजपकडे कल वाढताना दिसत आहे. असे असताना लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली आहे. मात्र त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर भाजपात नव्हे तर हैदराबादच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी काल (२२ जून) पक्षप्रवेश केला.

सुरेखा पुणेकर यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या धुमधडाक्यात प्रवेश केला होता. पण आता दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हैदराबाद येथील भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. सुरेखा पुणेकर या दोन दिवसांआधीच हैदराबादमधील डेरे येथे दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक भेटीगाठीही घेतल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ काढून बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे.

सुरेखा यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच त्यांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. त्या मोहोळ किंवा देगूलूर या दोन मतदारसंघातून बीआरएसच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे.