मेहनत फळाला आली! आयपीएल गाजवणाऱ्या युवा पठ्ठ्यांची पहिल्यांदाच कसोटी संघात निवड

बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (India Tour Of West Indies) भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे. यशस्वी जयस्वाल आणि रुतुराज गायकवाड यांचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर क्रिकेटच्या सर्वात प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये अजिंक्य रहाणेची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे.

यशस्वी जयस्वाल आणि रुतुराज यांना संधी मिळाली
यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांना आयपीएल 2023 मधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंचा प्रथमच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रुतुराजची कामगिरी अतुलनीय होती. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना या सलामीवीराने 16 सामन्यात 147 च्या स्ट्राईक रेटने 590 धावा केल्या.

त्याचवेळी, यशस्वी जयस्वालने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 14 सामन्यात 625 धावा केल्या. यासोबतच देशांतर्गत क्रिकेटमध्येही यशस्‍वीची बॅट जोरात बोलत होती, त्‍यामुळे त्‍याच्‍या संघात समावेश करण्‍याची मागणी सातत्याने होत होती. त्याचवेळी नवदीप सैनीचेही प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.