आता लवकरच नव्या सरकारचे फटाके फोडू; श्रीकांत शिंदे याचं सूचक वक्तव्य 

ठाणे – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० पेक्षा जास्त शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या (Guwahati) हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray) हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच  एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभा उपाध्यक्षांच्या नोटिशीवरील सुनावणी १२ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने सोमवारी ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, हा सत्याचा विजय असून शिवसेना (Shivsena) संपवण्याच्या राष्ट्रवादीच्या (NCP) प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाने लगावलेली चपराक आहे. तत्पुर्वी श्रीकांत शिंदे यांनी आनंद दिघे (Aanand Dighe) यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शनही घेतले होते. आता लवकरच नव्या सरकारचे फटाके फोडू आणि तुम्हालाही बोलावू असे सूचक विधान त्यांनी काल केले.