आपल्या वडिलांना घरी बसून आशीर्वाद देण्याची वक्तव्यं करणाऱ्यांपेक्षा आमच्यासारख्या मुली परवडल्या – सुळे

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा होता. आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाचे मेळावे झाले यात दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपली भूमिका कार्यकर्ते आणि नेत्यांच्या समोर मांडली. यावेळी काही लोक म्हणतात की ज्यांचे वय झाले त्यांनी केवळ आशीर्वाद द्यावेत. पण वय हा केवळ आकडा आहे, लढण्याची जिद्द हवी, असे प्रत्युत्तर खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिले.

मी महिला आहे, छोटसं बोललं तर डोळ्यात टचकन पाणी येतं, पण संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच महिला अहिल्या, तीच ताराराणी आणि तीच जिजाऊ होते, अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. आता ही जबाबदारी आपल्या सर्वांवर आली आहे. ही लढाई एका व्यक्तीविरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपल्याला लढायची आहे, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना केले.

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीला काही लोक नॅचरली करप्ट पार्टी असे बोलत होते. पण ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा, मुझे जरूरत पडेगी तो नॅचरली करप्ट पार्टी पुरा खा जाऊंगा’ असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या राज्यकर्त्यांना लगावतानाच या देशात सगळ्यात करप्ट पार्टी कोणती असेल तर ती भारतीय जनता पक्ष आहे, असा थेट आरोपही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

आपल्या वडिलांना घरी बसून आशीर्वाद देण्याची वक्तव्यं करणाऱ्यांपेक्षा आमच्यासारख्या मुली परवडल्या असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. या परिस्थितीत आपण हताश व्हायचे नाही. आपण पक्ष पुन्हा बांधू शकतो हा विश्वासही सुळे यांनी व्यक्त केला. जे गेलेत त्यांना आपल्या शुभेच्छाही दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आश्वासक चेहरा कोण यावर कार्यकर्त्यांमधून शरद पवार असा एकच आवाज उठला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याही बॅनरवर शरद पवारसाहेबांचा फोटो आहे. यापुढे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणा विरोधात लढायचं आहे. भाजपने केवळ द्वेष पसरवला आहे. त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने आपल्याला उतरायचे आहे असे आवाहन केले.