हायव्होल्टेज ड्रामा! विराट- नवीनच्या भांडणात गंभीरची उडी अन् पेटला नवाच वाद, भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

लखनऊ- विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वैर कुणापासून लपून राहिलेले नाही. आयपीएल 2013 मध्ये या दोन खेळाडूंमध्ये हाणामारी झाली होती. तेव्हापासून त्यांच्यात काही ना काही घडत राहते. आता 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर भिडले आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील साखळी फेरीतील 43व्या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला.

लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक (Naveen Ul Haq) आणि विराट कोहली यांच्यात पहिला वाद झाला. लखनऊ संघाच्या डावात नवीन फलंदाजी करत असतानाही त्याची विराटसोबतच चकमक झाली होती. पुढे सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत होते. यादरम्यान अफगाणिस्तानचा नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यात पुन्हा वादावादी झाली. यानंतर सहकारी खेळाडूंनी विराट कोहलीला बाजूला घेतले आणि वाद मिटवला.

https://twitter.com/aq30__/status/1653106638918922240?s=20

तसेच, सामन्यादरम्यान एक क्षण असाही आला जेव्हा गौतम गंभीर रागात विराट कोहलीच्या दिशेने चालत होता. यादरम्यान लखनऊच्या खेळाडूंनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. कर्णधार केएल राहुलही मदतीला आला. यावेळी विराट गंभीरच्या खांद्यावर हात ठेवून काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्यानंतर दोघांमधील तणाव वाढला. यानंतर अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने दोघांना वेगळे करत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. शिवाय सामन्यानंतर विराट लखनऊच्या काइल मेयर्सशी संवाद साधत होता. तेव्हा गंभीर आला आणि मेयर्सला बोलावून घेऊन गेला. अशाप्रकारे लखनऊ-बेंगलोर संघातील सामन्यात वादाच्या बऱ्याचशा घटना पाहायला मिळाल्या.