आम्ही साहेबांच्याच नेतृत्त्वाखाली निवडणूक लढणार, शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा फेटाळली

Maharashtra Politics : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे मोठा नेता काँग्रेसच्या हातून निसटला आहे. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव मांडल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गट काँग्रेसशी हात मिळवणार असल्याची चर्चा कालपासून सुरू होती. मात्र आता शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी या सर्व चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Politics) आम्ही शरद पवार यांच्याच नेतृत्त्वाखाली लढू. आमचा स्वतंत्र बाणा कायम राहील. आम्ही दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, असे प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी बुधवारी सकाळी राज्यभरातील नेते, खासदार, आमदार आणि माजी मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणासंदर्भात चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या पक्षाला येत्या दोन-तीन दिवसांत पक्षाचे नाव आणि चिन्ह द्यावे, अशी आमची मागणी आहे. शरद पवार साहेबांचे नेतृत्त्व संपूर्ण राज्याला मान्य आहे. त्यामुळे आम्ही आगामी निवडणुकांमध्ये साहेबांच्याच नेतृत्त्वाखाली लढणार आहोत. सुप्रीम कोर्टाने आम्हाला मूळ चिन्ह आणि पक्षाचे नाव दिले नाही तर आम्ही पक्षाचे नवे नाव आणि चिन्ह घेऊन लढू. आमचा स्वतंत्र बाणा कायम राहील. तेच अस्तित्त्व घेऊन आम्ही विधानसबा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले.

आम्ही दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणार, या चर्चेत काहीही तथ्य नाही. या बातम्या साफ चूक आहेत. आमची आजची बैठक पक्षाचे चिन्ह आणि नाव काय असू शकते, यासंदर्भात होती. पण आम्ही बॅकफूटवर आलो असा समज पसरण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशा बातम्या जाणीवपूर्व पेरल्या जात आहेत, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!