छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Chhagan Bhujbal : स्वराज्य सप्ताहातून राज्यातील जनतेला हे पटवून देऊ की आपला राजा हा बहुजनांचा राजा होता, शेतकऱ्यांचा राजा होता, मोल मजुरी करणाऱ्यांचा राजा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) ही याच कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) विचारांचा वारसा घेऊन पुढे जात आहे. बहुजनांचा राजा होता कसा हे रयतेला कळयला हवे असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित ‘स्वराज्य सप्ताह’चे उद्घाटन कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), कार्याध्यक्ष खा.प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, पार्थ पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

यावी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, महाराष्ट्राला प्रबोधन चळवळींचा मोठा वारसा लाभला आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, मुकुंदराव पाटील, भास्करराव जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील, दिनकरराव जवळकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या पर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रबोधन केले त्या सगळ्याचा प्रबोधन चळवळींची विचारधारा ही छत्रपती शिवाजी महाराज होते. आपण सुरू केलेली ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन करत गेली पाहिजे. या यात्रेच्या माध्यमातून समाजात संदेश गेला पाहिजे, रयतेला छत्रपती शिवाजी महाराज नेमके होते कसे हे समजावून सांगितले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, त्यामागे त्यांचे वडील शहाजीराजे व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉं साहेबांची प्रेरणा होती. या दोघांनाही त्यांच्या वडिलांकडून ही प्रेरणा मिळाली होती. दोघांच्याही घराण्यात दोन पिढ्यांपासून त्या दिशेने वाटचाल सुरू होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता, तर तो परिवर्तनासाठी होता असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य पाहिजे होते. त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून महाराजांनी राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी मोडून काढली. समता, बंधुता स्थापित केली. शिवरायांचे कार्य म्हणजे शहाजीराजे व जिजाऊंचे विचार कृतीत आणणारे शिवकार्य होते. शिवरायांचे वडील शहाजी महाराज यांनी शिवरायांना वयाच्या बाराव्या वर्षीच दिलेली शिवराजमुद्रा स्पष्टपणे ‘विश्ववंदिता’ असा उल्लेख करते. याचाच अर्थ शिवाजी महाराजांनी विश्वबंधुता, विश्वशांती, विश्वसौख्य, विश्वभरभराट, विश्व विकास अशी उदात्त भावना मनी ठेवूनच स्वराज्याची बांधणी केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते अजिंक्य असा लढवय्या पुरुष होते असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता आणि स्वधर्माबद्दल जाज्ज्वल्य अभिमान यांमुळे लोककल्याणार्थ राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना लाभली. धैर्य आणि साहस यांबरोबरच अखंड सावधानता जोपासली आणि तेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते. विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते असे म्हणणे सार्थ ठरते. जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा होता. त्याने सर्वप्रथम प्राधान्य हे शेतकऱ्यांना दिले. शिवाजी महाराजांचे सैन्य कोण होते, हे सगळे कष्टकरी, शेतकरी, मजुर, अलुतेदार, बलुतेदार सगळा बहुजन वर्ग होता असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, शिवरायांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली. पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी सूरु केली. शिवरायांवर पहिला पोवाडा महात्मा फुले यांनी लिहिला. शिवरायांवर दुसरा पोवाडा मुस्लिम समाजातील शाहीर अमर शेख यांनी लिहिला. हेच पोवाडे रशियात जाऊन आण्णाभाऊ साठे यांनी गायले. तत्कालीन व्यवस्थेत बहुजनांकरता व सर्वसामान्यांकरता धार्मिक व राजकीय अंधश्रद्धा जाचक ठरत होती. तसेच वतनदार, सरंजामदार यांच्याकडून सुटका होऊ शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीला पहिला छेद हा छत्रपती शिवाजी महाराजानी दिला आणि जाचक कायदे रद्द केले. म्हणूनच महाराज रयतेचे राजे, कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक, क्षत्रिय कुलावंत ठरले.आणि म्हणूनच त्यांचा ‘बहुजनांचा राजा’ म्हणून महात्मा फुले उल्लेख करतात असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, महाराजांचे सैनिक हे बहुजन समाजातील आहेत. त्यांनी मराठा क्षत्रियांबरोबरच रामोशी, कोळी, सोनकोळी, मुस्लीम, बेरड, महार, मांग, माळी यासारख्या जातींमधून व शेतकऱ्यांमधून आपल्या सैनिकांची नेमणूक केली. स्वराज्य स्थापन करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात सर्वधर्मीयांना समान स्थान होते. सर्वच धर्मांचा आदर होत होता. शिवरायांसोबत सर्वाधिक मावळे अठरा पगड जातीतील होते व स्वराज्यासाठी सर्वाधिक बलिदान ओबीसी समाजातील मावळ्यांनी दिले असे सांगत “महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले,मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा,
महाराष्ट्र आधार या भारताचा” या पंक्तीतून त्यांनी स्वराज्याचा गौरोदगार केला.

महत्वाच्या बातम्या : 

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया