ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको; सरकार ओबीसी समाजाच्या बाजूने ठाम- जयंत पाटील

मुंबई : आगामी काळात राज्यात महानगरपालिकेच्या निवडणूका होणार आहेत. पुणे, नाशिक आणि मुंबई या शहरात राजकीय पक्षांची चांगलीच चुरस लागण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील अलिकडेच खूप गाजला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय दिल्याने निवडणूकांचा मार्ग मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या निवडणूकांबद्दल बोलताना ते म्हणाले की, महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी समाजाचं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्यानंतरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात. असा आमचा पुर्ण ताकतीने निर्णय झाला आहे.

कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्य स्थिती छगन भुजबळ यांनी सर्वांना समजावून सांगितली आहे. काल कोणताही निर्णय झालेला नाही, परंतु आरक्षणाशिवाय निवडणूका होणार नसल्याची आमची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाजूने सरकार ठामपणे उभा आहे. त्यांना आरक्षण मिळाल्यानंतरच राज्यात निवडणुका होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

भाजपवर टीका करतांना ते म्हणाले की, भाजपच्या विरोधात जे उभे आहेत. त्यांच्यामागे तपास यंत्रणा लावणे आणि त्यांचं भय दाखवून सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे. हे आता लपून राहिलेले नाही. पुढे त्यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने राज्यातील पालिका निवडणूका नाही तर राज्यातील सगळ्या निवडणुका एकत्रितपणे लढाव्यात. यासाठी उरलेल्या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी त्याठिकाणी समन्वय ठेवावा आणि सर्वांना विश्वासात घ्यावं, ही आमची भूमिका आहे. स्थानिक लोकांना, स्थानिक नेतृत्वानांना यासंबंधी अधिकार दिले आहेत.