महाराजांचा अपमान होत असताना गप्प बसणं…, राज्यपालांच्या विधानानंतर रोहित पवार आक्रमक

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात आता त्यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केल्याने नवा पेटण्याची चिन्ह आहेत. चाणक्याशिवाय चंद्रगुप्त नाही तसंच समर्थांशिवाय शिवाजी महाराज नाहीत असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. ते औरंगाबादमध्ये मराठी भाषा गौरव दिवस आणि श्री दास नवमी निमित्त आयोजित केलेल्या समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना त्यांनी आपल्या भाषणामध्ये हे वक्तव्य केलं.

आज मराठी भाषा गौरव दिवस आहे, यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. राम मंदिर कार्यक्रम सुरू असताना मला समर्थ रामदासांचे नाव आठवत होते वेळोवेळी देशात संतांचे कार्य दिसले आहे. शक्तीची सर्वत्र पूजा होते, माजी आमदार, खासदारांना कोणी विचारत नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

तसंच शक्ती सर्वकाही आहे, त्यामुळे शक्तीची आराधना केली जाते आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरु मिळाला तो यशस्वी होतो, जसं चाणक्य नसते तर चंद्रगुप्त नसते तसंच जर समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यपालांच्या या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याचे चिन्ह आहेत.

राज्यपालांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता संताप व्यक्त केला जातोय. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे.’ असं रोहित पवार म्हणाले आहेत.

तर, ‘राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित, हीच त्यांची निती आणि शिकवण होती. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं.’ असं देखील रोहित पवार म्हणाले आहेत.