‘काँग्रेसला असं वाटतंय की स्वबळावर आमची सत्ता येईल, त्यांना यासाठी शुभेच्छा’

मुंबई : आज पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला आहे. 10 फेब्रुवारीपासून मतदान होणार असून 10 मार्चला निकाल लागणार आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्येही राजकीय तापमान वाढले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीत भाजप, काँगेससह देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात महाराष्ट्रात सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेने गोव्यात देखील काँग्रेस सोबत आघाडी करून निवडणूक लढवण्याची इच्छा वेळोवेळी व्यक्त केली आहे. त्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी देखील चर्चा केली होती. तर गोव्यात देखील मुक्काम वाढवला होता.

मात्र आता संजय राऊत यांनीच काँग्रेससोबत काही सूत जुळताना दिसत नसल्याचे संकेत दिले आहेत. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘गोव्यात काँग्रेस सोबत एकत्रित निवडणूक लढवावी अशी शिवसेना-राष्ट्रवादीची इच्छा आहे पण काँग्रेसला असं वाटतंय की तिथे त्यांना स्वबळावर 21-22 जागा मिळतील त्यांना यासाठी शुभेच्छा’. संजय राऊत यांच्या या विधानाने गोव्यात शिवसेना-काँग्रेसची आघाडी होणे जवळपास शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.