‘महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य सुरु आहे ते मोदी-शहा दिल्लीतून जी स्क्रिप्ट लिहून देतात त्याप्रमाणे होत आहे’

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेत, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडाळीमुळे राज्याचे विरोधी पक्षनेते पद आता काँग्रेसला (Congress) मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 40 आमदार आहेत. तर, काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. त्यामुळे विरोधी बाकांवर आता काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी विधान भवनातील कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या सर्व विधानसभा/ विधानपरिषद सदस्यांची बैठक बोलावली होती. यानंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यावेळी म्हणाले की, भाजपा जनतेचे मुळ विषयापासून दुसरीकडे लक्ष हटवण्यासाठी इतर मुद्द्यांना चर्चेत आणत असते. पण काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारला जाब विचारेल व भाजपाचा खरा चेहरा उघडा करेल. महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य सुरु आहे ते मोदी-शहा (Amit Shah-Narendra Modi) दिल्लीतून जी स्क्रिप्ट लिहून देतात त्याप्रमाणे होत आहे. काही लोकांना ईडी सीबीआयची भिती दाखवली जात आहे. भाजपाचे नाही ऐकले तर जेलमध्ये जावे लागेल या भितीतून हे सर्व सुरु आहे. महाराष्ट्रात जे राजकारण सध्या सुरु आहे ते दुःखद आहे. भूषणावह नाही. शाहु, फुले, आंबडेकरांच्या महाराष्ट्रात अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण होत आहे हे जनतेला पटलेले नाही.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे आज आमची वेट अँड वॉच ची भूमिका आहे. विरोधी पक्ष नेतेपदाबाबत ज्या पक्षांची सदस्य संख्या जास्त त्याच पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो. खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्या दोन स्वतंत्र बैठका होत आहेत, त्यानंतर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविली जाईल.असं ते म्हणाले.