Nana Gawande | नागपूरमधील चामुंडी कंपनीतील स्फोटाची सखोल चौकशी करा, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत द्या

Nana Gawande | नागपूर अमरावती रोडवरील धामणालिंगा परिसरातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट होऊन ६ निरपराध कामगारांचा जीव गेल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. दारुगोळा बनवणाऱ्या या कंपनीत झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करून मृतांच्या नातेवाईंकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत दिली पाहिजे तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करुन प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे (Nana Gawande) यांनी केली आहे.

चामुंडी कंपनीतील स्फोटासंदर्भात बोलताना नाना गावंडे म्हणाले की, कंपनीतील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ६ जणांमध्ये ५ महिला आहेत. जखमीमध्ये ३ जण अत्यवस्थ आहेत त्यात २ महिलांचा समावेश आहे. कंपनीत मोठा स्फोट झाल्यानंतरही तेथे अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका पोहचण्यास तब्बल दीड तास लागला. कंपनीत कोणताही मोठा अधिकारी उपस्थित नव्हता. दारुगोळा बनवणाऱ्या या कंपनीत कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती. या कामगारांना योग्य ते प्रशिक्षण दिले होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्य सरकारने यात गांभिर्याने लक्ष घालावे व पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे, ही मदत अत्यंत अपुरी असून प्रत्येकी २५ लाख रुपये मदत दिली पाहिजे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप