नाना पटोले कथित Viral Video प्रकरण : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या,…

पुणे  – महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओमध्ये महिलेसोबत दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले हे असल्याचा दावा करत चित्रा वाघ यांनी तो नाना पटोले यांना टॅग केला आहे. तसेच काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटिलात? असा खोचक प्रश्न विचारला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नाना पटोले चेरापुंजी, मेघालय येथे हॉटेलमध्ये एका महिलेसोबत खुर्चीवर बसल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नाना पटोले यांचे फोटोही जोडण्यात आले आहेत. सोबत काय झाडी काय डोंगर हे गाणेही जोडण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये नाना पटोले असल्याचे म्हणत तो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओप्रकरणी (Viral video) बोलताना नाना पटोले यांनी आपली बाजू मांडली. मला बदनाम करण्याचं कारस्थान असून याबाबत व्हिडिओची तपासणी करुन आमच्याकडून कायदेशीर बाजू मांडण्यात येईल.यासंदर्भात आमची लीगल टीम कार्यवाही करणार आहे, असे  नाना पटोले यांनी म्हटलं.

दरम्यान, आता या घडामोडींवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाकणकर यांनी, “संबंधित पिडिता राज्य महिला आयोगाकडे तक्रार करतात तेव्हा आम्ही त्याची दखल घेतो. राज्य महिला आयोगाकडे याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाहीय,” असं सांगितलं. पुढे बोलताना, “तक्रारी आल्यानंतर त्याची शहानिशा करुन संबंधित पोलिसांना कारवाई करा म्हणून सूचना देतो. राज्य महिला आयोग हे घटनात्मक दर्जाचा विभाग आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आमच्याकडे आलेली तक्रार, त्यासंबंधित पुरावे यासंदर्भात पोलीस विभागाला सूचना देत असतो,” असं आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना चाकणकर म्हणाल्या.