‘संजय राऊतांनी ही चोमडेगिरी बंद करावी, ते काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत’, नाना पटोले भडकले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. मात्र आता शरद पवारांच्या या निर्णयाचा परिणाम आता महाविकास आघाडीत दिसून येत आहे. शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) चांगलेच भडकले आहेत. त्यांनी संजय राऊत यांना चोमडेगिरी बंद करण्याचा सल्ला दिला आहे.

संजय राऊत म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये मल्लिकार्जुन खर्गे हे अध्यक्ष असले तरीही निर्णय मात्र राहुल गांधी घेत असतात. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरुन नाना पटोलेंनी त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे.

संजय राऊतांनी ही चोमडेगिरी बंद केली पाहिजे. मग उद्या निर्णय उद्धव ठाकरे नाही संजय राऊत घेतात असं म्हणलं जाईल का? आम्ही वारंवार सांगितलं आहे, आमच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत नाहीत, अशा शब्दांत नाना पटोलेंनी ठाकरे गटाच्या खासदारांना सुनावले आहे.

गांधी परिवार हा त्यागाचा परिवार आहे. प्रधानमंत्रीपदासारखी महत्त्वाची खुर्ची सोडणारा परिवार आहे. राहुल गांधींनी स्वत: राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे जेष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांना मोठा संघटनेचा अनुभव आहे. अशा अनुभवी नेत्याचा जर कोणी अपमान करणार असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी नाना पटोलेंनी दिला आहे.

तसेच शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर कोण राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष बनेल असे काँग्रेसला वाटते?, असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, “ही राष्ट्रवादीची पक्षांतर्गत बाब आहे. त्यामुळे त्यांनी कोणाला अध्यक्ष करावं हा त्यांचा अधिकार आहे. म्हणून दुसऱ्यांच्या घरात हस्तक्षेप करायचा अधिकार आमचा नाही आणि काँग्रेस असे कधी करणार नाही.”