औरंगजेबाच्या नावावरुन घोषणाबाजी करणाऱ्या ओवैसींनी मर्यादेत राहावं; नवनीत राणांचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच आता एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीने ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी अलीकडेच बुलढाणा येथे जाहीर सभेत औरंगाजेबाच्या नावाने कथित घोषणाबाजी केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. यानंतर विविध राजकीय नेत्यांनी ओवैसी यांच्यावर टीकेचा सूर धरला आहे. दरम्यान अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही ओवैसींवर टीकास्त्र सोडले आहे.

संबंधित व्हिडीओत नवनीत राणा म्हणाल्या, “मागील काही दिवसांपासून असदुद्दीन ओवैसी सातत्याने महाराष्ट्रात येत आहेत. ते कधी औरंगजेबाच्या नावानं घोषणा देतात, तर कधी व्यासपीठावर उभं राहून भडकाऊ भाषणं देतात. पण ओवैसी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही. जिथे तुमच्या घोषणा किंवा भडकाऊ भाषणं ऐकून घेतली जातील. त्यामुळे ओवैसींनी आपल्या मर्यादेत राहावं. ती मर्यादा पार करण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात. येथे ओवैसींचे भडकाऊ भाषण आणि औरंगजेबाच्या घोषणा चालणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि त्यानंतरच महाराष्ट्रात येण्याची हिंमत दाखवावी.”